नाती हरवत चाललेला समाज
"नात्यास नाव अपुल्या देऊ नकोस काही
साऱ्याच चांदण्यांची जगतास जाण नाही."
सुंदर असं अनामिक नातं कुसुमाग्रज यांनी आपल्या या ओळींमध्ये गुंफलेलं दिसून येतं. पण खरोखर नात्याचं काय स्थान आहे सद्यस्थितीतील समाजामध्ये? जर आपण आपल्या भारतीय संस्कृतीत डोकावले तर आजच्या समाजाचे वास्तव नक्कीच भयावह वाटेल. प्राचीन संस्कृतीत, अगदी अश्मयुगापासून टोळी करून राहणारा आदिमानव असो किंवा शेकडो राणी असणारे राजे, आपल्याला एकत्र कुटूंब पद्धती दिसून येतात. अगदी आपल्या आजी-आजोबांच्या पिढीपर्यंत आपल्याला एकत्र कुटुंब पद्धतीचा प्रभाव बघता येतो. परंतु आता कुटुंबाचा मूळ चेहरा बदलतोय. एकत्र कुटुंब ते विभक्त कुटुंब आणि नुकतीच उदयास आलेली एकल पालकाची संकल्पना. किती मोठे बदल आहेत हे !!
एकेकाळी ४ काका, ४ मावशी-मामा, ४आत्या असायचे. भावंडांसोबत जुळवून घेतानाच आम्हाला नाकीनऊ यायचे. पण त्यानंतर आली ती कुटुंबनियोजनाची शिकवण आणि आत्ताच हे बदलतं कुटुंब. फायद्यासाठी जरी इकडे मेजवानी असली तरी नात्यांमधील विश्वास कमी होऊन हेव्यादाव्यांना यामुळे खतपाणी मिळत आहे. संस्कारांचे महत्त्व कमी झाले आहे. त्यामुळे मानसिक वृत्ती मध्ये अमुलाग्र बदल घडत आहेत. हल्लीच्या कुटुंबांमध्ये भावंडं स्वार्थीपणा, अहंभाव याकडे झुकलेली दिसून येतात. जमीन, वारसा, हक्क हे शब्द एकत्र कुटुंबात मोठ्या प्रमाणात दिसतात. आपण म्हणतो 'घर म्हणल की भांड्याला भांड लागणार.' पण विभक्त कुटुंबातही काही वेगळी गत नाही.
थोडक्यात काय कुटुंब कसेही असो एकमेकांना समजून घेणारी काळजी करणारी आपल्याला आपल म्हणता येणारी माणसं असली, की तर त्यालाच आपण खरी नाती म्हणू शकतो. भले ती रक्ताची असो वा नसो.
आधुनिकीकरणाच्या लाटेसह पाश्चात्त्य संस्कृतीचा पगडा तरुण पिढीच्या मनावर अधिराज्य गाजवताना दिसून येतो. पोशाखाची पद्धत असो किंवा केशरचना, यांत्रिकबदल असो वा सोशल मिडियाची चलती सगळीकडे त्यांचा प्रभाव दिसतो. संस्कृतीची, नात्यांची, संस्काराची शिदोरी कनवटीला बाळगून चालणार आपला समाज खूप वेगळ्याच विश्वात रमत आहे. सोशल मीडियाद्वारे आपण कितीही जवळ आलो असू त्यामुळे आपल्या भावनांचे रिमोट त्याच्या हवाली करणे चुकीचे आहे. चित्र वाहीन्यांद्वारे प्रेमाच्या चाळ्यांचे विविध धडे लहानपणापासून थोरापर्यंत सगळ्यांना मिळतात. कोणत्याही नात्याचे पावित्र्य तर लांबच पण त्यातील गोडवा जपणारे कार्यक्रमही मोजकेच पाहायला मिळतात. सामाजिक विकृतींना खतपाणी घालण्यात याचा हात दिसतो. चंगळवादाचा प्रसार आणि प्रचार होताना दिसतो. स्वातंत्र्याऐवजी स्वैराचार यांचा भडिमार होतो. पिढीमधील विचारांच्या असमन्वयापायी नात्यांची घडी विस्कटताना दिसून येते.
"पैशाची जादू लई न्यारी,
पैशाच्या मागुनी धाव
दाम करी काम वेड्या
दाम करी काम."
असं म्हणत साधी राहणी उच्च विचार या तत्त्वांची पायमल्ली होतानाही दिसते.
आपला लहानपणीचा निरागसपणा जपतात ती नाती असतात.
प्रेमाच्या झोक्यात बसून आकाशाला गवसणी घालता ती नाती असतात.
पडता पडता सावरणारी नातीच असतात.
आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी ती नाती असतात.
आपल्यासाठी एखाद्याला धडा शिकवू पाहणारी ती नाती असतात.
अडी-नडीला मदतीला धावून येणारी ती नाती असतात.
आधाराची गरज असेल तर खांदा देणारी ती नाती असतात. जिवंतपणी नाही अगदी मेल्यावरही खांदा देतात ती नाती असतात. नात्यांचं एवढ महत्त्व लहानपणापासून एखाद्याच्या मनावर बिंबवलं तर तो व्यक्ती नक्कीच नाती जपेल. नाती जगली, तर कुटुंब जगतील आणि अशा कुटुंबांनी आपला समाज जगेल.
भौतिक सुखाच्या मागे लागून नात्यांकडे दुर्लक्ष होत आहे.
दिखाव्याच्या वृत्तीमुळे खरेपणाची नासधूस होत आहे. सुखासाठी नाती बनवली किंवा तोडली जात आहे. वात्सल्य, माया, ममता आणि निस्वार्थी प्रेम या भावनांची जीवनातील जागा रितीच राहत आहे. नात्यांतील दुराव्यामुळे निखळ आनंदाची कमतरता भासत आहे. नात्यांमुळे मिळणारे भावनिक स्थैर्य संपत आहे आणि त्यामुळे ताण-तणावाच्या पातळीमध्ये वाढ होताना दिसते. याचाच परिणाम म्हणून मानसिक आरोग्य सोबत शारीरिक आरोग्यालाही धक्का पोहोचत आहे.त्यामूळे आजच्या या काळात मानसिक आरोग्याला योग्य ते महत्त्व देणे अत्यावश्यक बनले आहे. त्यासाठी मनस्वास्थ्यावर विपरीत परिणाम होईल अशाच सवयींना आळा घालणं गरजेचे आहे. नाहीतर मानसिक समस्या सोबत शारीरिक समस्यांचाही मोठ्या प्रमाणात सामना करावा लागेल असा इशारा तज्ञांनी दिला आहे.
-Ms. Neha Ravindra Upasani (Intern, ListenWorks)
खरचं खूपच सुंदर लिहीलं आहे.very good beta👏🏿👏🏿👏🏿👌🏻👌🏻🙂
ReplyDelete