मन नक्की कुठं असतं? हे नेहमीच मला पडलेलं गुपित . परंतु 'मन हे अकरावे इंद्रिय आहे' असा दाखला आपल्याला न्यानेश्वरी मध्येही दिलेला आहे. मन म्हणजे मेंदूचा भावनिक भाग आहे असं आपण म्हणू शकतो, ते हृदयाजवळ असतं असं आपण म्हणू शकतो, किंबहुना ते शरीरातील अणुरेणू मध्ये सामावलेलं असतं असंही मला वाटतं. मानवी मेंदू मार्फत अनेक कार्य साधले जातात. संवेदना ओळखणं, विश्लेषण करणं, शरीराकडून योग्य संदेश घेऊन त्यास प्रतिक्रियारुपी संदेश पोहोचवणं असं ते एक गुंतागुंतीचं जाळ असतं. आणि याच जाळ्यात बाळ जन्मल्या पासून अनुभव त्यांची प्रतिक्रिया यांची जोडणी दडलेली असते. काळानुसार त्यांमध्ये बदल होत असतात परंतु या सर्व जोडण्या बालवयात कार्यरत केल्या नाहीत तर त्यांचा वापर मोठेपणी करता येणे कठीण असतं. जसे बालवयात जर आनंदी अनुभवांमध्ये भर पडली तर मनातील जोडण्या आनंदी अनुभवाशी निगडित असतात. याउलट दुःखात जोडण्यामुळे मोठेपणी सुखाची वृद्धी असूनही त्याचा अनुभव घेण्यास ते मूल असमर्थ ठरतं. दैनंदिन जीवनातील अनुभवातून ते मूल विकसित होत असतं. त्याच्या मेंदूच्या प्रगल्भतेला चालना मिळत असते. थोडक्यात काय तर एखाद्या मुलाला पालकांनी लहानपणी पुरवलेला अनुभव म्हणजे त्याच्या पुढील आयुष्याची शिदोरी. जसं आपण एखादा शब्द कळला नाही तर शब्दकोशात पाहतो, अगदी त्याचप्रमाणे कळत नकळत का होईना पण ते मुल प्रत्येक अनुभवांची सांगड बालवयातील जोडण्याशी करत असतं. याच आधारावर त्याचे भविष्य, आयुष्य सक्षमता आणि वृत्ती अवलंबून असतात. दैनंदिन व्यवहार आपण एक उदाहरण घेऊयात, लहानअसताना आई बाळाला वरणभात खायला देते. ती तिच्या पद्धतीने तूप, मीठ, लिंबू टाकून त्याला चव आणते. पण ती चव बाळाला ठीक वाटली नाही तर ते तो खात नाही. यावेळी एका ठिकाणी जर आईने अजून थोडं तूप मीठ घालून किंवा काही रंजकतेने ते जेवण बाळाला दिलं तर संपूर्ण जवळ आनंदाने मटामटा फस्त करतं. तिथे आलेल्या जोड्यांमध्ये आनंदाचा अनुभव असतो. त्याच ठिकाणी जर आईने बाळाला रागवून, जबरदस्तीने भात खायला सांगितला तर तो भीतीने खाऊ लागतो. त्याला ना इच्छा असते ना आवड. त्यामुळे त्याला तो भात संपत नाही. यामुळे आईचा पारा अजून चढतो आणि परत ती त्याला मारते. शेवटी घाबरून ओक्साबोक्शी तो रडू लागतो आणि त्याच्या पोटातला सगळा भात बाहेर येतो पडतो. हा झाला दुःखद अनुभव.
आता या प्रसंगाचे मुलाच्या मनावर काय पडसात पडतात ते बघू. आनंदी अनुभवामुळे आईविषयी चांगल्या भावना निर्माण होतात. न आवडल्यास बोलण्याचे, स्वातंत्र्याचे विचार बळावतात. वेगळेपणाची जाणीव निर्माण होते. शेवटी वेगवेगळे अनुभव सुंदर असतात आणि जीवन सुंदर आहे असं प्रतिबिंबित होतं. याउलट दुःखद अनुभवामुळे आईविषयी प्रेम, माया निर्माण न होता भीती निर्माण होते. आई म्हणेल ते बरोबर आणि मी तिच्याशी मिळताजुळता नसेल तर मी वाईट असा विचार येऊन स्वातंत्र्य संपुष्टात येते. अडचणीमध्ये न बोलता सहन करण्याची भावना बळावते. वेगवेगळे अनुभव हे प्रचंड वैतागवाणे असून जीवन हे खूप खडतर आहे असं त्याच्या मनात प्रतिबिंबित होतं.
भविष्यातील अडचणींवर दोन्ही मुलांच्या प्रक्रियांमध्ये ही खूप तफावत जाणवते. पहिला मुलगा आत्मविश्वास आणि शोधक वृत्ती यांमुळे प्रगतीपथावर चालतो. निर्भय आणि आशावादी बनून अडचणींना सामोरं जातो. अन्यायाबाबत कणखर असल्याने तो यशाचे शिखर हळूहळू आनंदाने सर करतो. याउलट दुसरं मूल मात्र घाबरट होतं. त्यामुळे नवीन गोष्टी अनुभवायला शक्यतो टाळाटाळ करतं. अडचणींमध्ये पळवाटा शोधत असतं. म्हणूनच ते बेजबाबदार अपयशी आणि नेबळट बनतं. तसेच दैनंदिन व्यवहारात आलेल्या अनुभवातून मूल शिकत जातात आणि सापेक्षतेने भविष्याकडे, जगाकडे पाहत असतात. आत्मविश्वास, शोधकवृत्ती, निर्भयता, आशावाद जबाबदारी, यशस्विता अशा अनेक गोष्टींचा पाया बालवयातच त्यांच्या मनात घातला जात असतो.
थोडक्यात काय तर मुलाच्या बालमनोवस्थेतील अनुभवांवर, त्याच्या मेंदूच्या जडणघडणीवर त्याचे व्यक्तिमत्व आणि भविष्य अवलंबून असते. त्यामुळे विचारपूर्वकतेने, शांततेने, गडबडून न जाता लहानपणीचा मुलांचा प्रत्येक अनुभव आनंदमय ठेवण्यास पालकांनी प्राधान्य देणे गरजेचे आहे. क्षणोक्षणी रुद्रावतार धारण करण्यापेक्षा शिस्तप्रियता ठेवून, मूल्य जपून, निवांतपणाने, प्रेमळ सहवासात एकमेकांच्या मदतीने मेंदूची तल्लखता वाढवण्याचा प्रयत्न करणे हे आजच्या काळातील पालकत्वाचे ध्येय असायला पाहिजे.
- Ms. Neha Upasani (Intern, ListenWorks)
Comments
Post a Comment